Corona Vaccination : ४५ वर्षांवरील नागरिकांना घ्यावी लागेल ऑनलाईन अपाॅइंटमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 10:33 AM2021-05-20T10:33:26+5:302021-05-20T10:33:32+5:30
Corona Vaccination in Akola : दुसऱ्या डाेससाठी ज्येष्ठांना सकाळी सहा वाजता ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.
अकोला : शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डाेससाठी आता लसीकरण केंद्राच्या ठिकाणी टाेकन दिल्या जाणार नाही. लसीकरण केंद्रांत हाेणारी गर्दी व काेराेनाचा संसर्ग पाहता दुसऱ्या डाेससाठी ज्येष्ठांना सकाळी सहा वाजता ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. ज्या दिवशी लस उपलब्ध असेल, त्याच दिवशी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याचे निर्देश आराेग्य यंत्रणेकडून प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाने मार्च महिन्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. लसीचा तुटवडा असताना केंद्र शासनाने १ पासून १८ ते ४४ या वयाेगटातील नागरिकांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटद्वारे लसीकरणाला प्रारंभ केला. यामुळे लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी प्रचंड गाेंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे शासनाने १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करून ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डाेसला प्राधान्य दिले. दुसऱ्या डाेससाठी लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी हाेणारी गर्दी पाहता आता ज्येष्ठांना सुद्धा ऑनलाईन अपॉइंटमेंटद्वारे नाेंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
दुसऱ्या डाेससाठी अत्यल्प लस उपलब्ध
४५ वर्षांवरील नागरिकांचा दुसरा डाेस घेण्याचा कालावधी संपुष्टात आला आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाने पर्याप्त प्रमाणात लस उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना मनपाच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेला दुसऱ्या डोससाठी को-व्हॅक्सिनचे १५०० आणि कोव्हिशिल्डचे केवळ एक हजार डाेस प्राप्त झाले आहेत.
२१ व २२ मे राेजी काेव्हॅक्सिन
येत्या २१ व २२ मे राेजी काेव्हॅक्सिनचा दुसरा डाेस कस्तुरबा गांधी रुग्णालय, भरतीया रुग्णालय, कृषी नगर मनपा शाळा क्रं. २२, आदर्श काॅलनी मनपा शाळा क्रं. १६ तसेच अकाेटफैलस्थित अशाेक नगर येथील नागरी आरोग्य केंद्रांत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपलब्ध राहील.