Corona Vaccine : ८६,६२२ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख ओलांडली
By atul.jaiswal | Published: September 15, 2021 10:48 AM2021-09-15T10:48:54+5:302021-09-15T10:51:03+5:30
Corona Vaccine: एकूण उद्दिष्टाच्या ३८.४६ टक्के लोकांनी पहिला, तर १५.८३ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेऊन झालेल्या नागरिकांपैकी तब्बल ८६,६२० जणांची दुसरा डोस घेण्याची निश्चित तारीख (ड्यू डेट) चालू आठवड्यात उलटून गेली आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे मुबलक डोस उपलब्ध असून, ड्यू डेट झालेल्यांनी लवकरच दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील १४,२४,२६८ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ७,७३,५१८ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. एकूण उद्दिष्टाच्या ३८.४६ टक्के लोकांनी पहिला, तर १५.८३ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यातील नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला आहे.
कोणत्या लसीचे किती ड्यू?
कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनी देण्यात येतो. जिल्ह्यात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी ६८,२२८ नागरिकांची ड्यू डेट उलटून गेली आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी १८,३९४ जणांची दुसरा डोस घेण्याची २८ दिवसांची मुदत उलटून गेली असून, त्यांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात सर्वाधिक
दुसरा डोस घेण्याची तारीख उलटून गेलेले सर्वाधिक नागरिक ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील तब्बल ५०,९३५ जणांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. अकोला शहरातील २६,६६५ तर तालुक्याच्या शहरांमधील ९,०२२ नागरिकांची दुसरा डोस घेण्याची ड्यू डेट उलटून गेली आहे.
कोरोना अजून संपलेला नाही, त्यामुळे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. पहिला डोस घेतलेल्यांनी शक्य तितक्या लवकर आधी घेतलेल्या लसीचाच दुसरा डोस घेतला पाहिजे. जिल्ह्यात दोन्ही लसींचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला