Corona Vaccine : अकोल्याला लसीचे १३ हजार डोस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:24 AM2021-06-28T10:24:50+5:302021-06-28T10:25:00+5:30
Corona Vaccine: यामध्ये कोविशिल्डचे ६ हजार ९००, तर कोव्हॅक्सिनचे ६ हजार १०० डोस आहेत.
अकोला: अकोल्यासह राज्यभरात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाल्याने, गत आठवड्यापासून कोविड लसीकरणाला वेग आला आहे. अशातच रविवारी विभागाला लसीचे ७२ हजार ४२० डोस प्राप्त झाले असून, यात अकोल्यासाठी १३ हजार डोसचा समावेश आहे. यामध्ये कोविशिल्डचे ६ हजार ९००, तर कोव्हॅक्सिनचे ६ हजार १०० डोस आहेत. मध्यंतरी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचा नियमित पुरवठा होत नसल्याने जिल्हाभरात कोविड लसीकरणाचा वेग मंदावला होता. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीअभावी अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा होती. दरम्यान, ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता दिसून आली. याच दरम्यान, गत आठवड्यात राज्यभरात १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहिमेला वेग मिळाला. मागणीनुसार कोविशिल्ड लसीचा पुरवठाही होऊ लागला आहे. रविवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे डोस प्राप्त झाल्याने लसीकरणाचा वेग आणखी वाढणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉ.राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी रविवारी अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्याला लसीचे वितरण केले.
जिल्हानिहाय प्राप्त लस
जिल्हा - कोव्हॅक्सिन - कोविशिल्ड
अकोला - ६,१०० - ६,९००
अमरावती - ९,९०० - ६,०००
बुलडाणा - ११,४०० - ६,४००
वाशिम - १२,६२० - १,०००
यवतमाळ - ९,९०० - २,२००
४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये उदासीनता
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांनाच्याच लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळाली. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी उदासीनता दिसून येत आहे. अनेक केंद्रांवर टोकन शिल्लक राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.