Corona Vaccine : स्पॉट नोंदणीमुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 10:30 AM2021-03-20T10:30:50+5:302021-03-20T10:31:11+5:30
Corona Vaccine: गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे
अकोला: कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षावरील आजारी व्यक्तींनाही लस दिली जात आहे. यातील अनेकांना कोविड लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणीची माहिती नाही. त्यामुळे कोविड लसीकरण केंद्रावर स्पॉट नोंदणीसाठी गोंधळ दिसून येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत लस घेण्यासाठी लाभार्थींना नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने कोविन ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, मात्र अनेकांना ऑनलाईन नोंदणी करता येत नसल्याने ते थेट कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन स्पॉट नोंदणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध कोविड लसीकरण केंद्रावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण होत असून येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नियोजन करताना त्रास सहन करावा लागत आहे. ही स्थिती पाहता नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.
अशी करा ऑनलाईन नोंदणी
- गुगलवर जाऊन www.cowin.gov.in या संकेतस्थळावर जा.
- यानंतर ‘सेल्फ रजिस्ट्रेशन’चा पर्याय निवडा.
- तुमच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करा आणि ओ.टी.पी.वर क्लीक करा.
- मोबाईलवर आलेला ओ.टी.पी. क्रमांकाची नोंद करा.
- आपल्या ओळखपत्रावरील संपूर्ण माहिती भरा.
- लसीकरणाचे ठिकाण निवडा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करुन लसीकरण केंद्र निवडावे. तसेच दिलेल्या वेळेत केंद्रावर हजर राहावे, जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. शिवाय, कमी वेळेत लस मिळण्यास सोयीचे जाईल.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला