Corona Vaccine : लसच उपाय, लसीकरणानंतर अकोला जिल्ह्यात एकही मृत्यू नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:54 AM2021-04-25T11:54:47+5:302021-04-25T12:01:16+5:30
Corona Vaccine: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मात्र, कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. तसेच कोविडचा संसर्ग झाल्यास त्याचा गंभीर परिणाम रुग्णावर झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे कोरोनावर लस हाच उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोविड लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. मोहिमेंतर्गत आतापर्यंत सुमारे २३ हजार लाभार्थींनी लसीचे दोन्ही डोस घेतले. लसीकरणानंतर काही लाभार्थींना कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, त्याचा प्रभाव गंभीर नसल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. तसेच लस घेतल्यानंतर कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचीही माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, अनेकांना गंभीर लक्षणे आहेत. यामध्ये कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अनेक रुग्ण आहेत. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाचे गंभीर लक्षणे आढळून आले नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत लस प्रभावी शस्त्र ठरत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
पहिल्या डोसनंतर जिल्ह्यातील केवळ सहा टक्के
पहिला डोस घेतल्यानंतर सहा टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये सुरुवातीच्या काळात ‘फ्रंटलाइन वर्कर’ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यानंतर सुमारे २० ते २५ दिवसांनी ॲन्टिबॉडीज तयार होतात.
दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे आदी नियमांचे पालन करावे लागते. लसीमुळे रुग्ण गंभीर होत नाहीत.
लसीकरणामुळे नागरिकांच्या शरीरात ॲन्टिबॉडीज तयार होतात. त्यामुळे कोरोना झाला, तरी त्याचा प्रभाव कमी होतो. रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचत नाही. अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेऊ शकतात. रुग्ण गंभीर होत नसल्याने मृत्यूचा प्रश्नच येत नाही.
दोन्ही डोसनंतर केवळ ०.२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि आता सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जात आहे. दोन्ही लस घेतलेल्यांपैकी केवळ ०.२ टक्के लोकांना कोविडचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. अशा रुग्णांना कोविडची सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे असे रुग्ण डॉक्टरांच्या मार्गदर्शनात घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
कोराेनाची लस सुरक्षित असून त्याचे चांगले परिणामही समोर येत आहेत. लस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, दोन्ही डोस घेतल्यानंतर ठराविक काळानंतर कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. ही चांगली बाब असून नागरिकांनी लस घेण्यास पुढाकार घ्यावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला
पहिला डोस - १,४०,४३१
दुसरा डोस - २५,३३०
एकूण - १,६५,७६१