कोरोना व्हॅक्सिन चोरी प्रकरण दडपले; चार महिने उलटूनही चौकशी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:15 AM2021-06-03T04:15:05+5:302021-06-03T04:15:05+5:30
चतारी ग्रामीण रुग्णालयातून व्हॅक्सिन चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होता. त्याच दिवशी पोलिसात तक्रार करणे ...
चतारी ग्रामीण रुग्णालयातून व्हॅक्सिन चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होता. त्याच दिवशी पोलिसात तक्रार करणे अपेक्षित होते; परंतु सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हॅक्सिन चोरी गेल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने १६ फेब्रुवारी रोजी डाटा ऑपरेटर दीपक सोनटक्के यांनी व्हॅक्सिन चोरल्याची तक्रार वैद्यकीय अधीक्षक स्वप्निल महवारे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली; परंतु व्हॅक्सिन दीपक सोनटक्के यांनी चोरली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. त्यानंतर चोरी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचा बनाव करून प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले. चार महिन्यांचा कालावधी उलटूनही कोणतीही चौकशी झाली नाही. पोलिसांच्या तपासामध्ये सुद्धा व्हॅक्सिन सापडले नाही. तक्रारीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर दीपक सोनटक्के यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दीपक सोनटक्के याला षडयंत्र रचून फसविण्यात आल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती; परंतु सदर तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.
व्हॅक्सिन लंपास करणारा कोण?
चतारी ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण कार्यक्रम पातूर येथे हलविण्यासाठी डॉक्टर व कर्मचारी दीपक सोनटक्के यांना वारंवार सांगत होते. याबाबतची माहिती सुद्धा दीपकने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली होती. याच कारणामुळे काही लोकांनी षडयंत्र रचून व्हॅक्सिन लंपास केल्या; परंतु पोलिसांनी खरा आरोपी अद्यापही सापडला नाही, ना त्या सात व्हॅक्सिनच्या बाटल्या सापडल्या.
मोठ्यांना वाचविण्यासाठी छोट्यांचा बळी
व्हॅक्सिनच्या ७ बाटल्या चोरी गेल्याची माहिती जिल्हाभरात पसरली होती. सदर प्रकरण राजकीय स्तरावर दडपण्यात आले असून, मोठ्या माशांना वाचविण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटरला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे समोर येत आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
व्हॅक्सिन चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रशासकीय फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते; परंतु त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून व्हॅक्सिनचे प्रकरण दडपण्यात येत आहे. व्हॅक्सिन चोरीमागील खरा सूत्रधार कोण? त्या सात व्हॅक्सिन गेल्या कुठे? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत.