Corona Vaccine : ३० ते ४५ वर्षे वयोगटातील लसीकरणास आजपासून प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 10:32 AM2021-06-19T10:32:45+5:302021-06-19T10:32:56+5:30
Corona Vaccine : शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ‘कोविन’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अपॉईन्मेंट सुरू करण्यात आली होती.
अकोला: जिल्ह्यात ३० ते ४५ वर्ष वयोगटातील लाभार्थींच्या कोविड लसीकरणाला शनिवार १९ जूनपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ‘कोविन’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अपॉईन्मेंट सुरू करण्यात आली होती. या वयोगटातील सर्वच लाभार्थींना कोविशिल्ड लस दिली जाणार असल्याची माहिती आहे. राज्यात ३० ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींच्या कोविड लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात करण्यासंदर्भात आरोग्य यंत्रणेला शुक्रवारी राज्य शासनाच्या सूचना मिळाल्या. त्यानुसार, शनिवार १९ जूनपासून जिल्ह्यात ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थींच्या कोविड लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी लाभार्थींना ऑनलाइन अपॉईन्मेंट अनिवार्य करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी रात्री ९ वाजता कोविन संकेतस्थळावर ऑनलाइन शेड्युल्ड टाकण्यात आले होते. पहिल्या दिवशी महापालिका क्षेत्रातील केवळ ६ केंद्रांवर या वयोगटासाठी लसीकरण राहणार आहे. रविवारपासून जिल्ह्यातील इतर केंद्रांमध्येही मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
१८ ते २९ वर्षे वयोगटातील लाभार्थींची प्रतीक्षा कायम
लसीकरण मोहिमेंतर्गत यापूर्वी १८ ते ४५ वर्ष असा वयोगट निश्चित करण्यात आला होता; मात्र शुक्रवारी राज्य शासनाच्या सुचनेनुसार ३० ते ४५ वर्षे वयोगट निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे १८ ते २९ वर्ष वयोगटातील लाभार्थींना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.