अकोल्यात कोरोना बळीचे शतक; ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:31 AM2020-07-18T10:31:56+5:302020-07-18T10:34:09+5:30
शुक्रवार, १७ जुलै रोजी कोरोनाचा १00 वा बळी नोंदविल्या गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, १७ जुलै रोजी कोरोनाचा १00 वा बळी नोंदविल्या गेला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये २१ जण, तर रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट मोहिमेत नऊ जण असे एकूण ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या २,०५७ झाली आहे. दरम्यान, २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितीत २८२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारीसकाळी २९७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १५ पॉझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांमध्ये अकोट, मूर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धिविनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा आणि पातूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सहा जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यामध्ये उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर, मूर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, १,६६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २९१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात एकाचा मृत्यू
मूर्तिजापूर : तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवारी जितापूर खेडकर येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडा तीन झाला आहे. जितापूर येथील या व्यक्तीस गत चार ते पाच दिवसांपूर्वी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, लदेसाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाळे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचरण राठोड यांनी दुजोरा दिला आहे.
रॅपिड टेस्ट: ३२३ चाचण्यांमध्ये नऊ पॉझिटिव्ह
1 रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट मोहिमेदरम्यान शुक्रवारी दिवसभरात झालेल्या ३२३ चाचण्यांमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात अकोला मनपा हद्दीत २४ चाचण्या झाल्या. त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह नाही. (आजपर्यंत अकोला मनपा हद्दीत २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.)
2 अकोला ग्रामीणमध्ये ७२ चाचण्या होऊन त्यामध्ये २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तेल्हारा येथे ६५ जणांच्या होऊन एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाळापूर येथे ४३ चाचण्या झाल्या. तेथे एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. पातूर येथे ५८ चाचण्या झाल्या. त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बार्शीटाकळी येथे ६१ चाचण्या झाल्या. त्यात एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
दिवसभरात ३२३ चाचण्यांमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजअखेर जिल्ह्यात १,४३२ रॅपिड अॅन्टीजेन टेस्टद्वारे ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.