CoronaVirus : अकोला जिल्ह्यात ६७ टक्के खाटा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:47 AM2020-10-16T11:47:19+5:302020-10-16T11:49:43+5:30
Covid Care Centers, Akola गत पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाल्याने बहुतांश खाटा रिक्त झाल्या आहेत.
अकोला: गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी झाली. त्यामुळे उपलब्ध खाटांपैकी ६७ टक्के खाटा रिक्त झाल्या आहेत. यात खासगीच्या तुलनेत शासकीय खाटांची संख्या जास्त आहे. मोठे खासगी कोविड सेंटर वगळल्यास इतर कोविड सेंटरमधील बहुतांश खाटा रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णसेवेचा संपूर्ण भार एकट्या सर्वोपचार रुग्णालयावर होता. जून, जुलै महिन्यात कोरोना बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने ऑगस्ट महिन्यात काही खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात आले; मात्र सप्टेंबर महिन्यात दररोज शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा हजारावर गेला होतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांसह हाॅटेल्सदेखील अधिग्रहित करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात कोविडसाठी पुरेशा खाटांची व्यवस्था झाली. परंतु ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच रुग्णसंख्यावाढीचा वेग मंदावला. गत पंधरा दिवसात ॲक्टिव्ह रुग्णांची सख्या झपाट्याने कमी होत ५०० पेक्षा कमी झाली. त्यामुळे उपलब्ध खाटांपैकी ६७ टक्क्यांपेक्षा जास्त खाटा रिक्त झाल्या आहेत. यातील बहुतांश खाटा या शासकीय रुग्णालयातील आहेत. लहान खासगी कोविड केअर सेंटर वगळल्यास मोठ्या खासगी केअर सेंटरमध्ये मोजक्याच खाटा रिक्त असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कोविड सेंटरची परिस्थिती
जिल्ह्यात शासकीय आणि खासगी मिळून एकूण १३ कोविड केअर सेंटर आहेत. गत महिन्यात रुग्णवाढीचा वेग कमालीचा असल्याने खाटांची संख्या वाढविण्यात आली होती; मात्र गत पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाल्याने बहुतांश खाटा रिक्त झाल्या आहेत. खासगी कोविड केअर सेंटरमध्ये ६६ खाटा रिक्त आहेत.
जिल्ह्यातील शासकीय कोविड केअर सेंटर - १३
शासकीय - ५
खासगी - ८
मागील पंधरा दिवसात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. आयसीयूमध्येदेखील व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात रिक्त झाले आहेत. जीएमसीत सद्यस्थितीत १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
- डॉ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला.