CoronaVirus in Akola : कृषी नगरमध्ये सर्वेक्षणासाठी १५ पथकांचे गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:46 AM2020-04-29T10:46:10+5:302020-04-29T10:46:16+5:30
मनपा प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिंधी कॅम्प परिसरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या किराणा व्यावसायिकाच्या दुकानातील दोन कामगारांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला आहे. दोन्ही कामगार पूर्व झोनमधील प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या कृषी नगर परिसरातील रहिवासी असल्यामुळे मनपा प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे.
२६ एप्रिल रोजी शहराच्या दक्षिण झोन अंतर्गत येणाºया प्रभाग क्रमांक १६ मधील सिंधी कॅम्पस्थित पक्की खोली परिसरात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला. संबंधित रुग्ण किराणा व्यावसायिक असल्यामुळे शहरातील कोरोना बाधितांच्या संकेत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांना तसेच जीएमडी मार्केटमधील किराणा दुकानात काम करणाºया मजुरांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले असता, मंगळवारी व्यावसायिकाच्या कुटुंबातील तीन सदस्य व दुकानात काम करणाºया दोन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला. अर्थात एकाच दिवशी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
प्रतिबंधित क्षेत्र घोषित!
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रभाग क्रमांक १३ मधील कृषी नगर परिसरातील न्यू भीम नगर तसेच कवर नगर परिसराला केंद्रबिंदू मानत हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत या भागातील संपूर्ण वाहतूक व दैनंदिन कामकाज पूर्णत: बंद करण्यात आले आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात येऊ नका. प्रभागात सर्वेक्षणासाठी येणाºया महापालिकेच्या पथकांना सविस्तर माहिती द्या, जेणेकरून कोरोनाची लक्षणे आढळून येणाºया रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होईल.
- संजय कापडनीस,
आयुक्त, मनपा