Corona Virus: बालरुग्णांवर ‘प्री फॅब्रिकेशन युनिट’मध्ये होणार उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 10:39 AM2021-08-31T10:39:10+5:302021-08-31T10:39:20+5:30
Pediatric patients to be treated in pre-fabrication unit : हे युनिट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणार असून, त्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
- प्रवीण खेते
अकोला: सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोविडग्रस्त बालरुग्णांवर उपचारासाठी ‘प्री फॅब्रिकेशन युनिट’ सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात हे युनिट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणार असून, त्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोविडची स्थिती सद्यस्थितीत नियंत्रणात दिसून येत आहे; मात्र रुग्णसंख्या वाढ कासव गतीने वाढत असल्याने चिंता वाढत आहे. ही स्थिती दुसऱ्या लाटेपूर्वी जानेवारी महिन्यात होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्कतेने पाऊल टाकत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोविडचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांच्यासाठी ‘प्री फॅब्रिकेशन युनिट’ सुरू करण्याची तयारी राज्य स्तरावर केली जात आहे. राज्य शासनामार्फत यासंदर्भात स्थानिक आरोग्य विभागाला तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोविडच्या बालरुग्णांसाठी ‘प्री फॅब्रिकेशन युनिट’ची तयारी सुरू करण्यात आली आहे. युनिटमध्ये लहान मुलांसोबतच त्यांच्यासोबत आईला राहण्याची व्यवस्था, लहान मुलांच्या करमनुकीसह गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिनज आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था केली जात असल्याची माहिती आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील हे युनिट ४२ खाटांचे राहणार असल्याची माहिती आहे.
मूर्तिजापूरमध्ये ३२ खाटांचे युनिट प्रस्तावित
कोविडच्या दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेतही रुग्णसेवेचा संपूर्ण भार सर्वोपचार रुग्णालयावर पडू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याकडे लक्ष दिले जात आहे. त्या अनुषंगाने मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही ३२ खाटांचे ‘प्री फॅब्रिकेशन युनिट’ तयार करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
ग्रामीण रुग्णालयातही युनिट उभारण्याची तयारी
लहान मुलांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण वाढल्यास जिल्ह्यातील पाचही ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांसाठी ‘प्री फॅब्रिकेशन युनिट’ सुरू करण्यात येऊ शकते. या युनिटचा सेटअप अल्पावधीतच उभारणे शक्य असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
सप्टेंबरमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला आहे. त्या अनुषंगाने कोविडच्या बालरुग्णांसाठी ‘प्री फॅब्रिकेशन युनिट’ सुरू करण्याचे काम सुरू आहे. या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी, तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्रिसूत्रीचे पालन करावे. घरोघरी पालकांनी लहान मुलांना याविषयी प्रशिक्षण द्यावे.
- डॉ. वंदना पटोकार (वसो), जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी. गंभीर रुग्णांचे प्रमाण