Corona Warrior : चिमुकले घरी; आई-वडील बजावताहेत कोविड वॉर्डात सेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:00 AM2020-05-23T10:00:46+5:302020-05-23T10:00:55+5:30
कोरोनाच्या संकटकाळात दोघे पती, पत्नी स्वत:चा जीव धोक्यात घालून घरापासून, मुलांपासून लांब राहून कर्तव्यनिष्ठेचे पालन करीत आहेत.
- नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: घरात दोन चिमुकली मुले, आईवडील दोघेही रुग्णसेवेत. दोन महिन्यांपासून पती, पत्नी दोघेही सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वार्डात सेवा देत आहेत. दोन महिने झाले मुलांची भेट नाही. कोरोनाच्या संकटकाळात दोघे पती, पत्नी स्वत:चा जीव धोक्यात घालून घरापासून, मुलांपासून लांब राहून कर्तव्यनिष्ठेचे पालन करीत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या कक्षात सेवा देत आहेत.
पातूर येथे राहणारे अनूप रमेश तायडे हे आरोग्यसेवक असून, त्यांची पत्नी संध्या अनूप तायडे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका आहेत. त्यांना तुषार व आदित्य ही दोन लहान मुले आहेत. तुषार सातवीत शिकतो तर आदित्य हा चौथीत शिकतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच काही थांबले आहे. या अशा संकटकाळात जीव धोक्यात घालून रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिका, डॉक्टरांना कुटुंबापासून दूर राहून सेवा द्यावी लागत आहे. त्यापैकीच एक तायडे दाम्पत्य आहे. दोन महिन्यांपासून कुटुंबापासून, मुलांपासून दूर राहून हे पती, पत्नी प्रामाणिकपणे कोविड वार्डात कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देत आहेत. कोविड वार्डात कार्यरत असल्यामुळे त्यांना घरीही जायला मिळत नाही. मुलांची आठवण येते. त्यांना भेटावेसे वाटते; परंतु भेटता येत नाही. मुलेसुद्धा आई-वडिलांच्या भेटीसाठी आसुसलेले आहेत. आई-वडिलांना भेटण्याचा ते हट्ट करतात; परंतु त्यांची कशीबशी समजूत घालण्यात येते. एवढेच नाही तर अनूप तायडे यांच्या तीन बहिणी प्रीती, स्मिता व कीर्ती या तिघीसुद्धा अमरावती येथील रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत. मोठी बहीण प्रीती तायडे ही सुपर हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहे. स्मिता तायडे ही इर्विन हॉस्पिटलमध्ये तर लहान बहीण कीर्ती ही पीडीएमसी रुग्णालयातील कोविड वार्डांमध्ये सेवा देत आहे. अख्खं कुटुंबच कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत गुंतले आहे.
चिमुकल्यांना सोडून बहिणीची रुग्णसेवा!
अनुप तायडे यांची मोठी बहिण प्रीती तायडे ही अमरावतीतील सुपर हॉस्पिटलमधील कोविड वार्डात सेवा देत आहे. तिला अर्णव आणि अद्विका ही दोन मुले आहेत. या लहानग्यांना सोडून दोन महिन्यांपासून ही माउलीसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहे.
आजी करतेय मुलांचा सांभाळ!
अनुप व संध्या तायडे यांना तुषार व आदित्य ही लहान मुले आहेत. त्यांना सोडून पती, पत्नी कोविड वार्डात सेवा बजावत आहेत.
त्यामुळे या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी लता तायडे यांच्यावर आली आहे.