कोरोना योद्धा उपेक्षित; सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 11:39 AM2020-06-28T11:39:03+5:302020-06-28T11:39:13+5:30
सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच ट्रॅक्टर चालकांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या भागात साफसफाईची कामे करणाºया सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच ट्रॅक्टर चालकांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने संबंधितांच्या आरोग्य तपासणीला खो दिल्याचे समोर आले आहे.
कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील उत्तर झोनमध्ये ७ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. आजरोजी कोरोनाबाधित रुग्णांनी १,४२१ चा आकडा गाठला असून, रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले जात आहेत. कंटेनमेन्ट झोनमधील नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी महापालिकेचे शिक्षक तसेच आशा वर्कर कामाला लागले आहेत. याव्यतिरिक्त शहरातील प्रतिबंधित भागात दैनंदिन साफसफाई करण्यासाठी मनपाचे सफाई कर्मचारी जात आहेत. मागील तीन महिन्यांपासून प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर आरोग्य तपासणी जात असल्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच शहराच्या विविध भागातील सर्व्हिस लाइन तसेच नाल्यांची सफाई कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे केली जात आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता व नागरिकांकडून सोशल डिस्टनन्सिंगचे होणारे उल्लंघन लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शिक्षक, आशा वर्कर, सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी पहिल्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्रात साफसफाईची कामे करणारे सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच ट्रॅक्टरवरील चालकांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश स्वच्छता व आरोग्य विभागाला दिले होते.
पूर्व झोनमधील तपासणी आटोपली
मनपा प्रशासनाने पूर्व झोनमधील कार्यरत सफाई कर्मचाºयांसोबतच इतर कर्मचाºयांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित झोनमधील कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करणे अपेक्षित होते. पुढे ही तपासणी झालीच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित झोनमध्ये तपासणीची प्रक्रिया कधी, असा सवाल कर्मचाºयांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
सुरक्षा साधनांचा अभाव
शहरात दैनंदिन साफसफाई करणारे सफाई कर्मचारी तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करणाºया शिक्षक-आशा वर्कर यांना सुरक्षा साधनांची पुरेशा प्रमाणात पूर्तता होत नसल्याची परिस्थिती आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.