कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज लागतो १९ मेट्रिक टन ऑक्सिजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:15 AM2021-06-02T04:15:58+5:302021-06-02T04:15:58+5:30
संतोष येलकर अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर कायम असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ...
संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर कायम असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज १९ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. मागणीप्रमाणे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात गत फेब्रुवारीपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज १९ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. मागणीप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता जिल्हा प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत असून, ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागत आहे.
‘या’ ठिकणाहून असा होतो
आॅक्सीजन पुरवठा !
जिल्हयातील कोरोनाबाधीत रुग्णांसाठी शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांना आॅक्सीजनचा पुरवठा करण्याकरिता सद्यस्थितीत नागपूर येथून दररोज १५ मेट्रीक टन आणि आठवड्यातून एकदा पुणे येथून १५ ते २० मेट्रीक टन आॅक्सीजनचा पुरवठा होत आहे.
‘या’ रुग्णालयांना केला
जातो आॅक्सीजनचा पुरवठा!
अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), जिल्हा स्त्री रुग्णालय, मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हयातील खासगी कोविड रुग्णालयांना कोरोनाबाधीत रुग्णांसाठी आॅक्सीजनचा पुरवठा करण्यात येतो. यासोबतच वाशिम जिल्हयातील आक्सीजनची गरजदेखिल अकोल्यातूनच भागविण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांना दररोज असा
करावा लागतो पाठपुरावा!
जिल्हयातील शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांसाठी आॅक्सीजनची किती गरज आहे, आॅक्सीजनचा साठा किती उपलब्ध आहे, आॅक्सीजनचा पुरवठा कोणत्या ठिकणाहून करावा लागणार आहे, आॅक्सीजनचे टॅंकर किती येणार, आॅक्सीजनचा पुरवठा करणारे टॅंकर एमआयडीसीमधील प्लांटच्या ठिकाणी केव्हा पोहोचणार, आॅक्सीजनचा पुरवठा किती झाला, याबाबतचा पाठपुरावा दररोज सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना करावा लागतो.
जिल्हयातील शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांसाठी सद्यस्थितीत दररोज १९ मेट्रीक आॅक्सीजनचा साठा लागत आहे. आवश्यकतेप्रमाणे आॅक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दररोज नियोजन करण्यात येत आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.