गावठाणांच्या ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षणाला ‘कोरोना’चा ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:39+5:302021-07-20T04:14:39+5:30
अकोला : स्वामीत्व गावठाण भूमापन योजनेंतर्गत जिल्ह्यात सात महिन्यांपूर्वी ‘ड्रोन’द्वारे गावठाणांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ...
अकोला : स्वामीत्व गावठाण भूमापन योजनेंतर्गत जिल्ह्यात सात महिन्यांपूर्वी ‘ड्रोन’द्वारे गावठाणांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७५१ गावठाणांपैकी २५१ गावठाणांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीत जिल्ह्यातील उर्वरित ५०० गावठाणांच्या ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षणाला ‘कोरोना’चा ब्रेक लागला आहे.
स्वामीत्व गावठाण भूमापन योजनेत भूमी अभिलेख विभागामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ७५१ गावांच्या गावठाणातील मालमत्तांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण करण्याचे काम ३ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट व तेल्हारा या तीन तालुक्यांतील २५१ गावठाणांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोरोना विषाणू संसर्गामुळे २२ फेब्रुवारीपासून ‘ड्रोन’द्वारे गावठाणांचे सर्वेक्षण करण्याचे काम थांबविण्यात आले. गत १० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील ७५१ गावठाणांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे सर्वेक्षणाच्या कामाला ‘ब्रेक’ लागल्याने, जिल्ह्यातील ५०० गावठाणांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षणाचे काम अद्याप प्रलंबित आहे.
तीन तालुक्यांत सर्वेक्षण केलेल्या
गावठाणांची अशी आहे संख्या!
तालुका गावठाण
मूर्तिजापूर १२७
तेल्हारा ८०
अकोट ४४
.................................................
एकूण २५१
मालमत्ताधारकांना मिळणार अद्ययावत मालमत्तापत्रक !
गावांच्या गावठाणातील सर्व मालमत्तांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मालमत्तांचे नकाशे तयार करून तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक मालमत्तेला नमुना ८ संलग्न करून अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यानंतर मालमत्ताधारकांना ऑनलाइन पद्धतीने अद्ययावत मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चार तालुक्यांतील सर्वेक्षण प्रलंबित!
कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी व पातूर या चार तालुक्यांतील गावठाणांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षणाचे काम अद्याप प्रलंबित आहे. यासोबतच अकोट तालुक्यातीलही काही गावठाणांचे सर्वेक्षण रखडले आहे.
जिल्ह्यातील ७५१ गावठाणांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण गत १० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे २२ फेब्रुवारीपासूुन सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आले. जिल्ह्यात २५१ गावठाणांतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले असून, कोरोना विषाणूचा संसर्ग नसल्यास येत्या ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील उर्वरित ५०० गावठाणांचे सर्वेक्षण सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
विलास शिरोडकर
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग.