कोरोनाचे संकट वाढले; सर्वोपचारसह खासगी रुग्णालयात उसळली रुग्णांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 10:57 AM2020-09-27T10:57:09+5:302020-09-27T10:57:22+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील मान्यताप्राप्त कोविड सेंटर असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णासाठी ‘बेड’ उपलब्ध नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
अकोला : जीवघेण्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०८१ च्या घरात पोहोचली असतानासुद्धा बाजारपेठमधील नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील मान्यताप्राप्त कोविड सेंटर असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णासाठी ‘बेड’ उपलब्ध नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या संकटात आणखी वाढ होण्याची चिन्हे असली तरीही अकोलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
महापालिका क्षेत्रात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जून महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र होते. त्यानंतर मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यादरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा महापालिका क्षेत्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचे समोर येत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा प्रशासन तसेच महानगरपालिका प्रशासनामध्ये आपसात समन्वय असणे अपेक्षित आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी ठोस कृती आराखडा तयार करून त्यानुसार परिस्थिती हाताळणे अपेक्षित असतानाच सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे भाग आहे. या ठिकाणी नेमके उलटे चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल ७०८१ च्या घरात पोहोचला असतानासुद्धा महापालिका क्षेत्रातील बाजारपेठमध्ये अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी अकोलेकर गर्दी करीत आहेत. बाजारपेठेत नागरिकांकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याची परिस्थिती आहे.
... तरच कोरोनाला लगाम लावता येईल!
कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीचा मुकाबला केला जात असताना दुसरीकडे व्यापार-उद्योग सुरू असले पाहिजेत याबद्दल दुमत नाही; परंतु बाजारपेठ उघडल्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी तसेच ग्राहकांनीसुद्धा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच कोरोनाला लगाम लावता येणार असून, त्यासाठी आता अकोलेकरांनीच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अकोलेकरांनो, रुग्णालयांमध्ये जागा नाही!
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शहरातील मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. या सर्व बाबींचे भान जिल्हावासीयांनी व शहरवासीयांनी ठेवणे गरजेचे झाले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व रुग्णालयांमधील जागेचा अभाव लक्षात घेता आम्ही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाकडे सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणी ३०० खाटांची व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाशी मुकाबला करणे हा सामूहिक लढा असून, अकोलेकरांनी साथ देण्याची गरज आहे.
- संजय कापडणीस आयुक्त, मनपा