‘कोरोना’चे पोलिसांवर संकट; कुटुंबीयही धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 11:10 AM2020-05-04T11:10:21+5:302020-05-04T11:10:27+5:30
पोलिसांचा थेट कोरोनाशीच संपर्क येत असल्याची चर्चा सध्या पोलीस खात्यात आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोल्यातील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसांवर कोरोनाचे संकट गडद होत असून, केवळ अकोलेकरांच्या निष्काळजीमुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही धोक्याचे सावट आहे.
शहरातील प्रत्येक चौकात तसेच कंटेनमेंट झोनमध्ये सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पोलिसांचा थेट संपर्क आता कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या रुग्णांच्या सहवासात असलेल्या नागरिकांशी येत आहे. कंटेनमेंट झोन किंवा शहराच्या इतर भागातील नागरिक विविध कारणे शोधून विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे पोलिसांनी पकडल्यानंतर उघडकीस येत आहे. अशाच विनाकारण फिरणाऱ्यांची तब्बल २ हजार ५०० पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत.
विनाकारण रस्त्यावर फिरणारे हे कोरोनाचे वाहक ठरू शकतात. पर्यायाने पोलिसांनाही कोरोनाचा धोका निर्माण करीत आहेत.
लक्षणे नसलेल्यांना कोरोनाचा धोका
राज्यातील पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यानंतर यामधील बहुतांश पोलिसांना कोरोनाची लक्षण नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अकोला पोलिसांनाही अशाच प्रकारे लक्षणे नसलेल्या कोरोनाची प्रचंड भीती असून, त्यांनी आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली आहे. मनपा अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे; मात्र अकोला पोलिसांचा थेट संपर्क येत असतानाही त्यांची आरोग्य तपासणी नाही.
शेकडो अकोलेकरांशी थेट संपर्क
भाजी बाजार, किराणा दुकाने, मेडिकल, दवाखाने तसेच कंटेनमेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळलेल्या परिसरात पोलिसांचा थेट कोरोनाशीच संपर्क येत असल्याची चर्चा सध्या पोलीस खात्यात आहे; मात्र त्यानंतरही या पोलिसांना कोणतीही सुरक्षा नसल्याचे वास्तव आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्यापासून ते पोलीस शिपायापर्यंत सर्वच पोलीस कोरोनाशी लढा देत आहेत.