गणेश मूर्तिकारांवर कोरोनाचे ‘विघ्न’; ७० टक्के मूर्ती पडून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:06+5:302021-07-12T04:13:06+5:30
गत दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम अत्यल्प प्रमाणात सुरू आहेत. मागील वर्षी गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा ...
गत दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम अत्यल्प प्रमाणात सुरू आहेत. मागील वर्षी गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यास बंधने आली होती. यावर्षी १० सप्टेंबरला लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात पारंपरिक उत्साह संचारण्याची आशा सार्वजनिक गणेश मंडळांना होती; परंतु शासनाने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या गणेश मूर्तिकारांची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील मूर्तिकारांकडे मागील वर्षीची ७० टक्के मूर्ती शिल्लक आहे. त्यामुळे यंदा मूर्ती तयार कराव्यात की नाही, असा प्रश्न मूर्तिकारांपुढे उपस्थित राहिला आहे.
दरवर्षी ५० लाखांची उलाढाल!
शहरात २०-२५ मोठ्या मूर्ती तयार करणारे मूर्तिकार आहेत. छोट्या-मोठ्या सर्व मूर्तिकारांची दरवर्षी ५० लाखांची उलाढाल होते. शहरातील मूर्तिकारांची भिस्त खेड्यापाड्यातील ग्राहकांवर अवलंबून आहे. हे ग्राहकच न आल्याने मूर्तिकारांना मोठे नुकसान झाले. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील ५०० कारागीर आर्थिक संकटात
बहुतांश मूर्तिकारांकडे गतवर्षीच्या गणेशमूर्ती पडून आहेत. त्यामुळे यंदा गणेशमूर्ती कमी प्रमाणात तयार करण्यात येणार आहेत. याकरिता जास्त कारागीर लागणार नसल्याने शहरातील ५०० मूर्ती कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत.
मूर्ती तयार करण्याचे साहित्यही महागले!
यावर्षी नवीन मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य महागले आहे. त्यामुळे मूर्ती तयार करण्याचा खर्चही वाढला आहे. पीओपीवर १५ टक्के वाढ झाली असून रंग ३० ते ४० टक्क्यांनी महागला आहे.
गतवर्षी १५० मोठ्या गणेशमूर्ती बनविल्या होत्या. यातील ४० मूर्ती शिल्लक आहेत. त्यामुळे मटेरिअलचा खर्चही निघाला नाही. यंदा नवीन ऑर्डर सुरू असून शासनाच्या नियमावलीमुळे अडचणी येत आहेत.
- बबलू नारायणे, मूर्तिकार
मागील वर्षी ११०० छोट्या गणेशमूर्ती बनविल्या. यातील केवळ ३०० मूर्ती विकल्या गेल्या. त्यामुळे यंदा केवळ ४-५ नवीन प्रकारच्या मूर्ती बनवित आहे. शासनाने रात्री उशिरापर्यंत मूर्ती विकण्यास मुभा द्यावी.
- मनोज गोलवाल, मूर्तिकार