कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:55+5:302021-05-20T04:19:55+5:30
ऊन वाढले तरी... जिल्ह्यात एप्रिल महिन्यात साधारणत: ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले होते. मे महिन्यात पहिल्या आठवड्यात ...
ऊन वाढले तरी...
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात साधारणत: ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले होते. मे महिन्यात पहिल्या आठवड्यात ३९ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तापमानात चढउतार दिसून येत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेकजण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायांना लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.
उन्हाळा घरातच!
दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी, तर मे महिन्यात कडक निर्बंध लागू आहेत. औषधं, दवाखाना, रुग्णवाहिका, अंत्यसंस्कार आदी अत्यावश्यक कारणांशिवाय सकाळी ११ वाजल्यानंतर घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा घरातच जात असल्याने ऊन लागण्याचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही. सकाळी ११ वाजल्यानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.
उष्माघातापासून बचाव म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विशेष व्यवस्था केली जाते. या वर्षी उष्माघाताचा रुग्ण आला नाही. कडक निर्बंध लागू असल्याने नागरिकदेखील घरातच आहेत. उन्हापासून बचाव म्हणून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघाताची लक्षणे आढळून आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
वर्ष - मृत्यू
२०१९ - १
२०२० - १
२०२१ - ०