Big Breaking : अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी; मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:52 AM2020-04-15T11:52:21+5:302020-04-15T12:19:42+5:30
अकोला शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू सोमवारी रात्री झाला.
अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अकोल्यात हातपाय पसरल्यानंतर आता अकोल्यात या विषाणूच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. कोविड-१९ हा आजार झालेल्या अकोला शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू सोमवारी रात्री झाला. सदर व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली. अकोल्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली असून, त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे १३ पॉझिटीव्ह रुग्ण होते. यापूर्वी एका रुग्णाने आयसोलेशन कक्षात आत्महत्या केल्यामुळे आता १२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील ४५ वर्षीय एक ाव्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवार १३ एप्रिल रोजी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघात कक्षात त्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच रात्री ८.३० वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला होता. दरम्यान खबरदारी म्हणून त्या रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी घेण्यात आले होते. मंगळवारी त्या रुग्णाचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करुन त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
रुग्णाला होता मधुमेहाचा आजार
रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाबाची समस्या होती. शिवाय, त्याला खोकलाही असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
१२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू
सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात १२ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या एकूण १४ वर पोहोचली असून, त्यापैकी एकाने आत्महत्या केली होती, तर दुसºया व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सध्या जिल्ह्यात १२ कोरोना बाधित रुग्ण आहेत.