CoronaVirus:अकोल्यात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:41 PM2020-03-07T18:41:23+5:302020-03-07T18:45:10+5:30
CoronaVirus: मुळ अकोल्यातील रहिवासी असलेली २४ वर्षीय तरुणी जर्मनीला नोकरीसाठी गेली होती
अकोला : सध्या सर्वत्र कोरोनाचा धसका बसलेला आहे; अशातच अकोल्यात ‘कोरोना’चा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मुळ अकोल्यातील रहिवासी असलेली २४ वर्षीय तरुणी जर्मनीला नोकरीसाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीवरुन भारतात पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यानंतर ती थेट अकोल्यात पोहोचली. घरी आल्यावर तरुणीला ताप येण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना? असा संशय आल्याने शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तरुणीने थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात धाव घेतली. डॉक्टरांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने तरुणीवर उपचारास सुरुवात करण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचार सुरू आहेत.
नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला
कोरोना आयसोलेशन वार्डात दाखल होताच रुग्णाच्या घशातील श्वासाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी तत्काळ पुण्याला पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसांचा अवधी लागणार आहे.
कोरोनाचा एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. त्यावर उपचार सुरू असून नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसांत तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील उपचार सुरू करण्यात येतील. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला