बेफिकीरीमुळे अकोला जिल्ह्यात पुन्हा उंचावतोय कोरोनाचा आलेख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 10:47 AM2021-02-01T10:47:27+5:302021-02-01T10:49:11+5:30
CoronaVirus in Akola जानेवारीत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे.
अकोला: जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रणासाठी ‘नो मास्क नो एन्ट्री’ हा उपक्रम राबविण्यात आल्याने, प्रत्येक जण मास्कशिवाय घराबाहेर पडत नव्हते. मात्र, आता या मोहिमेचा अनेकांना विसर पडल्याचे चित्र रविवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’च्या माध्यमातून दिसून आले. बेफिकीरी अनेकांसाठी घातक ठरत असून, अकोलेकरांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाने कहर केला होता. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले गेले. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात कोरोना संसर्गाच्या फैलावाची गती मंदावली होती. परंतु, जानेवारीत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे. यामागचे कारण तपासून घेण्याचा प्रयत्न केला असता, अकोलेकरांची बेफिकीरीच कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनातर्फे ‘नो मास्क, नो एन्ट्री’ ही मोहीम राबविण्यात आली होती. सुरुवातीला मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र काही दिवसांतच अकोलेकरांना या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. बसस्थानक, गांधी चौक, मोहम्मद अली मार्ग आदी गर्दीच्या ठिकाणी सर्वांनाच विनामास्क प्रवेश दिला जातो. ही बेफिकीरी कोरोनाला पुन्हा एकदा निमंत्रण देत आहे, त्यामुळे अकोलेकरांना वेळीच सावध होण्याची गरज असून सर्वांनी आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आराेग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
कुठे कशी बेफिकीरी
बसस्थानक
- बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली, मात्र अनेकांकडून मास्कचा उपयोग नाही.
- एसटी बसमध्ये चढणाऱ्या एकाही प्रवाशाचे तापमान तपासले जात नाही.
- फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन नाही.
- एसटी महामंडळाकडूनही प्रवाशांना दिला जातो विनामास्क प्रवेश.
कापड बाजार
- सध्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
- येथेही फिजिलक डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही.
- दुकानात विनामास्कच प्रवेश दिला जातो.
- शोरुम लहान असो वा मोठे, दोन्ही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश.
ऑटोमध्येही विनामास्कच प्रवेश
लॉकटाऊननंतर काही नियमांच्या अधीन राहून शहरातील रस्त्यांवर पुन्हा एकदा ऑटो धावू लागले. प्रारंभी नो मास्क नो एन्ट्री या नियमाचे पालन करण्यात आले. शिवाय, मर्यादित प्रवाशांनाच ऑटोत प्रवेश दिला जात होता. मात्र, आता एका ऑटोत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दिसून येतात. यातील क्वचितच प्रवाशांना मास्क दिसून येते. अनेक ऑटोचालकच विनामास्क ऑटो चालवत असल्याचे लोकमत रिॲलिटी चेकच्या माध्यमातून दिसून आले.
जिल्ह्यात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर होवून चालणार नाही. नो मास्क नो एन्ट्री हा नियम सर्वांनीच पाळावा. नागरिकांनीही प्रशासनाला साथ देवून कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी योगदान द्यावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला