बेफिकिरीमुळे वाढला कोरोनाचा प्रकोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:59 AM2020-09-21T10:59:08+5:302020-09-21T10:59:19+5:30
सर्वसामान्यांसह आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी कोरोनाच्या बाबतीत चिंता वाढविणारी ठरत आहे.
- प्रवीण खेते
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. रुग्णालयात गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असतानाही सर्वसामान्यांसह आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी कोरोनाच्या बाबतीत चिंता वाढविणारी ठरत आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र तरीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये एकीकडे भीतीचे वातावरण आहे; मात्र तरीदेखील बहुतांश लोक मास्कविनाच रस्त्यावर वावरत आहेत. मनात भीती असली तरी प्रत्यक्षात मात्र लोक बेफिकिरीने राहत असल्याचे वास्तव आहे. तर दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीतही आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी दिसून येत आहे. रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्याच्याशी वेळीत संपर्क साधला जात नाही. तर दुसरीकडे होम क्वारंटीन असलेल्या रुग्णांच्या हातावर होम क्वारंटीनचे शिक्के मारले जात नाहीत. त्यामुळे कोविडचे रुग्ण बिनधास्त बाहेर फिरताना दिसून येत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या बेफिकिरीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव आणखी वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांची बेफिकिरी
प्रारंभी - आता
सॅनिटायझरचा जास्त उपयोग - सॅनिटायझरचा फारसा उपयोग नाही
बाहेर निघण्यास टाळायचे - आता गटागटाने फिरणाऱ्यांची संख्या वाढली
जीवनावश्यक वस्तूंची होम डिलेव्हरी - थेट बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
मास्क, रुमालचा उपयोग - मास्कचा वापर अनेक जण टाळताना दिसून येत आहेत
खाद्यपदार्थांच्या निर्जंतुकीकरणावर भर - याकडे फारशे लक्ष दिले जात नाही
सहा महिन्यातील बदल
प्रारंभी | आता |
---|---|
रुग्ण आढळताच परिसर सील | रुग्णाचे घरही सील केले जात नाही |
पॉझिटिव्ह अहवाल येताच रुग्णाशी संपर्क | पॉझिटिव्ह अहवाल येऊनही रुग्णांशी उशिरा संपर्क |
हायरिस्क संदिग्धांच्या तपासण्या | फक्त कुटुंबातील सदस्यांच्याच चाचण्या (अनेकदा त्यांच्या चाचण्यांकडे दुर्लक्ष) |
बाहेरून येणाºया प्रत्येक व्यक्तीची तपासणी | नागरिकांनी स्वत:हून संपर्क साधल्यावरच तपासणी |
रुग्णालयात दहा दिवस उपचार | दीड दिवस सर्वोपचार रुग्णलयात, तर पाच दिवस पीकेव्ही क्वारंटीन सेंटरमध्ये उपचार |
पॉझिटिव्ह रुग्णाच्या तीन चाचण्या | एकचदा चाचणी केली जाते |