जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर कोरोनाचे सावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:07+5:302021-02-24T04:21:07+5:30
अकोला: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे; मात्र जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात ...
अकोला: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे; मात्र जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, ही सभा ऑफलाईन होणार की ऑनलाईन, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर कोरोनाचे सावट पसरले आहे.
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी ४ मार्च रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी व्हीडीओ काॅन्फरन्सिंगव्दारे घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या विविध १८ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करीत, संबंधित ठराव जिल्हा परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी १० फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुषंगाने विभागीय आयुक्तांनी अंमलबजावणी करण्यास मनाई केलेल्या १८ ठरावांसह इतर विषयांवर ४ मार्च रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतू जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ४ मार्च रोजी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्यात येणार की ऑनलाईन होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर कोरोनाचे सावट पसरल्याचे चित्र आहे.