शहरात कोरोनाचा हाहाकार; ३४६ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:09+5:302021-05-05T04:31:09+5:30
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली असून मंगळवारी तब्बल ३४६ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे ...
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली असून मंगळवारी तब्बल ३४६ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा व मनपाची यंत्रणा सैरभैर झाल्याची परिस्थिती आहे. यामुळे आरोग्य सेवेवर ताण आला असून आता नागरिकांनीच नियमांचे कठोरपणे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांत काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याची परिस्थिती आहे. शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरीही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दिलेल्या अवधीत दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्याचे परिणाम समाेर येत असून मंगळवारी शहरातील तब्बल ३४६ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़
पूर्व व दक्षिण झाेन नियंत्रणाबाहेर
मागील दोन महिन्यांपासून काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहे. दाेन्ही झाेनमधील रुग्णांची वाढती संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी पूर्व झोनमध्ये काेराेनाचे तब्बल १४५ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ३१, उत्तर झोनमध्ये ५४ व दक्षिण झोनमध्ये ११९ असे एकूण ३४६ रुग्ण आढळून आले आहेत.
१६०२ जणांनी केली चाचणी
शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाच्या चाचणी केंद्रांत मंगळवारी १६०२ जणांनी चाचणी केली. यामध्ये ५२१ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच १०८१ जणांनी रॅपिड अँटिजेन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
अकोलेकरांनो मास्क वापरा!
कोरोना विषाणूमध्ये बदल होत असल्यामुळे आजाराची विविध लक्षणे समोर येत आहेत. अशा वेळी आता एक नव्हे तर दोन मास्क वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. मास्क हेच कोरोनापासून ९५ टक्के बचाव करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.