कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:51 AM2021-06-07T10:51:48+5:302021-06-07T10:51:56+5:30
Akola News : कोरोनाची लाट ओसरू लागल्याने आता आपली नोकरीही जाणार, अशी चिंता कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सतावते आहे.
अकोला: जिल्ह्यातील कोविडची दुसरी लाट आता ओसरू लागल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे; मात्र ही लाट ओसरू लागल्याने आता आपली नोकरीही जाणार, अशी चिंता कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सतावते आहे. त्यामुळे आता नवा रोजगार कसा आणि कुठे मिळणार, अशा चर्चाही या कर्मचाऱ्यांमध्ये होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मनुष्यबळाची टंचाई भासू लागली होती. ही उणीव भरून काढण्यासाठी आरोग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर पदभरती करण्यात आली होती. पहिली लाट ओसरताच १०० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले होते. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर फेब्रुवारी महिन्यात कोविड संसर्गाचा वेग पुन्हा वाढू लागला. पाहता पाहता कोविडची दुसऱ्या लाटीस सुरुवात झाली. पहिल्या लाटेच्या तुलनेत यंदा गंभीर रुग्णांची संख्या जास्त असल्याने कर्मचाऱ्यांची गरज भासू लागल्याने पुन्हा कंत्राटी तत्त्वावर पदभरती करण्यात आली. या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १२ ते १४ तासांची रुग्णसेवा दिली. सुविधा अपुऱ्या असल्या तरी लॉकडाऊनच्या काळात रोजगार मिळाला, शिवाय रुग्णसेवेची संधी मिळाली या भावनेतून हे कर्मचारी आजही आपले कर्तव्य चोख पार पाडत आहेत. दरम्यान, कोविडची दुसरी लाटही आता ओसरू लागली आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची चिंता पुन्हा सतावू लागली आहे.
जिल्ह्यात एकूण कोविड केअर सेंटर - ०७
कंत्राटी स्टाफ - २५०
सध्या सुरू असलेले सेंटर - ०७
बंद झालेले सेंटर -००
संकटाच्या काळात धावून आलेत, पण...
लॉकडाऊनच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजगाराची गरज होती, त्या प्रकारे प्रशासनालाही मनुष्यबळाची गरज होती.
अशा संकटाच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला साथ देत रुग्णसेवेला सुरुवात केली.
या कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा केल्याचा आनंद मिळाला; मात्र वेळेवर मानधन मिळाले नाही.
रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना मानधनासाठी चार, पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली.
अशा परिस्थितीत त्यांचा रोजगार गेल्यास शासनाची भूमिकाही सकारात्मक हवी.
काय म्हणतात कंत्राटी कर्मचारी
- कोरोनाची दुसरी लाट ओसरली, मात्र सध्या तरी ड्युटी सुरू आहे. पुढे काय होईल, हे माहीत नाही. रुग्णालयात रुजू झाल्यापासून निरंतर रुग्णसेवा देत आहोत. प्रशासनाने आमचा विचार करावा.
- राहुल तायडे, अटेंडन्स, जीएमसी
सध्या तरी ड्युटीवर सुरू आहोत. या काळात रुग्णसेवा केल्याचा आनंद आहे; मात्र कोरोनाची लाट ओसरू लागल्याने रोजगार जाण्याचीही भीती आहे. प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी सकारात्मक विचार करावा.
- भारत पहुरकर, अटेंडन्स
मागील दीड वर्षांपासून सर्वोपचार रुग्णालयात रोजंदारीवर कार्यरत आहे. क्षमतेपेक्षा जास्त तास काम केल्या जाते; मात्र मानधन मिळत नाही. प्रशासनाने कंत्राटीसह रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही विचार करावा.
- विजय शाहू, वॉर्डबॉय