Coronavaccine अकोला जिल्ह्यात कोरोना लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 15:58 IST2021-01-16T15:00:22+5:302021-01-16T15:58:53+5:30
Coronavaccine News: डॉ. आशिष गिऱ्हे यांना पहिली लस देण्यात आली.

Coronavaccine अकोला जिल्ह्यात कोरोना लसीकरणास प्रारंभ
अकोला: जिल्ह्यात शनिवार १६ जानेवारी रोजी कोविड लसीकरणाची सुरुवात जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ऑर्बीट हॉस्पीटल या तीन केंद्रावर करण्यात आली.
प्रारंभी जिल्हा स्त्री रुगालयाच्या कोविड लसीकरण केंद्र येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. लसीकरण केंद्राची फित कापून जिल्हाधिकाऱ्यांनी विधीवत प्रारंभ केला. यावेळी विधान परिषदेचे सदस्य डॉ. रणजीत पाटील, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड,मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक आरती कुलवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अशी झाली सुरुवात
लसीकरणासंबंधित डाटा संकलित केलेल्या ‘कोविन ॲप’ मधील नोंदींनुसार नोंदविलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. यावेळी लसीकरण करुन घेण्यासाठी नोंदणी कक्षात आलेल्या व्यक्तिस टोकन देऊन, नाव नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ओळखपत्र वा आधार कार्डच्या आधारे नोंदणीची ऑनलाईन पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लसीकरण कक्षात लस घेणाऱ्या व्यक्तीच्या सर्व शंकांचे निरसन करुन लस टोचण्यात आली. त्यानंतर झालेल्या लसीकरणानंतर संबंधित व्यक्तिस काही परिणाम जाणवतात वा लक्षणे दिसतात का याबाबत निरीक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीस निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले.
अकोला जिल्ह्यात पहिली लस जिल्हा स्त्री रुग्णालयाचे डॉ. आशिष गिऱ्हे यांना देण्यात आली. या सर्व टप्प्यावर लसीकरण अधिकारी व त्यांचे कर्मचारी तैनात होते.
या लसीरकणाच्या विविध टप्प्यांची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अन्य मान्यवरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. लसीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीची जिल्हाधिकारी यांनी व्यक्तीश: विचारपूस केली. आज पहिल्या टप्प्यात तिन्ही केंद्रावर प्रत्येकी 100 याप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. एकूण 15 टप्प्यात 4 हजार500 आरोग्य कर्मचाऱ्यास लस देण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिस दल, लष्कर, महसूल कर्मचारी व इत्तर कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. पुढील टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक 50 वर्षाखालील मधुमेह, रक्तदाब, कर्करोग व इत्तर दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना देण्यात येणार आहे.
लसीकरण केल्यानंतर घ्यावयाची काळजी
लसीकरणानंतरही मास्क वापरणे, हात स्वच्छ करणे व सामाजिक अंतर ठेवणे, या तीन सुत्राचे पालन करणे आवश्यक राहील. प्रत्येक लाभार्थ्यींना पहिली लसीकरण केल्यांनतर त्या व्यक्तीस किमान 28 दिवसानी दुसरा लसीकरणाचा डोस देण्यात येईल.जिल्हाधिकारी यांनी स्त्री रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ऑर्बीट हॉस्पीटल येथील लसीकरण केंद्रास भेट देवून पाहणी केली व तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यात.