CoronaVirsu : अकोल्यात १८ तासांतच आढळला दुसरा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:50 AM2020-04-08T11:50:56+5:302020-04-08T16:07:18+5:30
हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे.
अकोला : आतापर्यंत कोरोना विषाणूचा शिरकाव न झालेला जिल्हा अशी ओळख निर्माण केलेल्या अकोल्यात गत चोविस तासात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.
मंगळवारी स्थानिक बैदपुरा भागातील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर १८ तासांतच दुसरा रुग्ण आढळल्यामुळे अकोल्यावरील कोरोना संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत.
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता; परंतु मंगळवारी सायंकाळी बैदपुरा भागातील एकाला कोरोनाची लागन झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर खबदरदारी म्हणून बैदपुराच्या तीन किलोमिटर परिघातील परिसर सिल करण्यात आला आहे. हा भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला असून, पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अशातच बुधवारी सकाळी आणखी एका रुग्णाच्या थ्रोट स्वॅब चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील दुसºया कोरोनाबाधीत रुग्णाची नोंद झाली आहे. अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे गरजेचे झाले आहे.
४६ अहवाल प्रलंबित
सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत १३६ संदिग्ध रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ८८ वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. तर दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही ४६ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित असून, त्यांच्या वैद्यकीय अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे.