CoronaVirus : अकोल्यात १५ टक्के रुग्ण डबल म्युटंट स्ट्रेनचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 10:39 AM2021-04-13T10:39:58+5:302021-04-13T10:40:07+5:30
Double mutant strain : जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या जवळपास १५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन असण्याची शक्यता आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढला असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वैद्यकीय सूत्रांच्या मते कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन असून जवळपास १५ टक्के रुग्ण या नव्या प्रकारातील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध आजार असणाऱ्या व्यक्तींसह वयोवृद्धांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत.
गत दीड महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलल्या जात आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असून, संसर्गाचा वेगही जास्त असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांच्या मते हा कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन असून पूर्वीच्या कोरोनाच्या तुलनेत अधिक वेगाने पसरणारा आहे. अकोल्यासह हा प्रकार राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही आढळून आल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या जवळपास १५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन असण्याची शक्यता आहे. लक्षणे जुनीच असली, तरी कमी वेळात रुग्ण गंभीर होत असल्याने नागरिकांनी विशेषत: विविध आजार असणाऱ्या व्यक्तींसह वयोवृद्धांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
‘एनआयव्ही’कडे पाठविले होते नमुने
जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ आणि गंभीर रुग्णांचे वाढलेले प्रमाण पाहता अकोल्यातील रुग्णांचे काही नमुने ‘एनआयव्ही’ पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. लॅबला पाठविण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी साधारणत: १५ टक्के नमुने कोरोनाच्या डबल म्युटंट स्ट्रेनच्या संसर्गाचे असल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली. ‘एनआयव्ही’पुणे मार्फत हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
अल्पवधीतच रुग्ण गंभीर अवस्थेत
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे अल्पावधीतच रुग्णाची प्रकृती गंभीर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी गंभीर लक्षणे दिसून येत होती, मात्र नव्या स्ट्रेनमुळे दोन ते तीन दिवसांतच रुग्णाला गंभीर लक्षणे दिसून येत आहेत.