CoronaVirus : अकोल्यात आणखी २२ रुग्ण वाढले; एकूण आकडा ६२७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:13 AM2020-06-02T11:13:47+5:302020-06-02T11:40:05+5:30
मंगळवार,२ जून रोजी आणखी २२ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ६२७ झाली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा विळखा आणखीनच घट्ट होत असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवार,२ जून रोजी आणखी २२ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ६२७ झाली आहे. यापैकी ४४२ रुग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत १५१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली.
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. सोमवार, १जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६०५ होती. यामध्ये मंगळवारी आणखी २२ रुग्णांची भर पडून हा आकडा ६२८ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून मंगळवारी सकाळी ४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६ अहवाल निगेटिव्ह आहेत.
आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १० पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. दोन महिला रुग्ण ह्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. हे रुग्ण रजपुतपुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथिल दोन, माळीपुरा येथील दोन, अशोकनगर अकोट फैल येथील दोन तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ, आंबेडकरनगर, शिवसेना वसाहत, जुने तारफैल, आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी, रुद्रनगर, जुनी उमरी नाका, खदान, पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अकोला शहर हे प्रामुख्याने कोरोनाचे केंद्र बिंदू ठरले असून, शहरात १०० पेक्षाही अधिक कन्टेनमेन्ट क्षेत्र आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही ३४ वर गेली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केलेली आहे. आतापर्यंत ४४२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी बहुतांश जण घरी गेले आहेत. तर काही जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आता १५१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल-४८
पॉझिटीव्ह-२२
निगेटीव्ह-२६
आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६२७
- मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४४२
- दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१५१