CoronaVirus : २४ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:10 AM2020-04-26T10:10:25+5:302020-04-26T10:10:49+5:30
संकट अजून टळले नसून, नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाशी लढा देत पातुरातील सात जण पूर्णत: बरे झाले असून, सात ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असले तरी चांगली बातमी म्हणजे सलग सहा दिवसांपासून एकही नवीन ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळला नसल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटलाच करीत आहे. शनिवारी आणखी २४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आलेत; पण संकट अजून टळले नसून, नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात सध्या शहरातील सात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सलग सहा दिवसांपासून वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ येत आहे. ही चांगली बातमी आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ५०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; परंतु अनेकदा कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्याने कोरोना बाधितांची ओळख करणे शक्य नाही. त्यामुळे एकापासून अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे, तसेच ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. प्रत्येकाने आता काळजी घेण्याची गरज आहे. हात सतत स्वच्छ पाण्याने धुवावे व घरीच थांबावे.
तीन संदिग्ध रुग्ण नव्याने दाखल
शनिवारी तीन संदिग्ध रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. आजपर्यंत ५३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५०८ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. १३ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामध्ये १२ प्राथमिक तर एक फेरतपासणीचा आहे.
चार तालुक्यांत एकही बाधित आढळला नाही!
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत खबरदारी म्हणून बाहेरून आलेल्या नागरिकांना ‘होम क्वारंटीन’ किंवा ‘इन्स्टिट्युशनल क्वॉरंटीन’ करण्यात आले आहे. आतापर्यंत यातील पातूर, बाळापूर आणि अकोल्यात एकूण १६ बाधित रुग्ण आढळले; परंतु मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी या चार तालुक्यांमध्ये आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही.
१४ दिवसांत २८८ नमुन्यांची चाचणी
अकोल्यात १२ एप्रिलपासून ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू झाल्याने अकोल्यातच कोरोना संदिग्ध रुग्णांच्या नमुन्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. दिवसाला सरासरी जिल्ह्यातील २० नमुन्यांची चाचणी केली जात आहे. लॅब सुरू झाल्यापासून गत १४ दिवसांत २८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.