CoronaVirus : अकोट तालुक्यातून २४ संदिग्ध सर्वोपचारमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:12 AM2020-04-10T11:12:48+5:302020-04-10T11:12:56+5:30
२४ संशयित रुग्णांना ‘थ्रोट स्वॅब’करिता अकोला येथे सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले.
अकोला: कोरोनाच्या पृष्ठभूमीवर अकोट ग्रामीण रुग्णालयात ७ एप्रिलपर्यंत १ हजार ५७८ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी २४ संशयित रुग्णांना ‘थ्रोट स्वॅब’करिता अकोला येथे सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले. अद्याप अकोट तालुक्यातील कोणताही रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळलेला नाही.
कोरोना विषाणूचा सर्वत्र फैलाव सुरू असताना शासनाच्या आरोग्यासंदर्भात असलेल्या दिशानिर्देशानुसार अकोट ग्रामीण रुग्णालयात कोरोना संशयितांच्या तपासणीकरिता विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. या ठिकाणी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. तसेच ज्यांच्यात प्राथमिक लक्षणे आढळून आली, अशा काही रुग्णांच्या हातावर शिक्का मारून ‘होम क्वारंटीन’चा सल्ला देण्यात आला आहे. आतापर्यंत १ हजार ५७८ लोकांची तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार करून आरोग्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालयातच विलगीकरण कक्षात थांबण्याबाबत सांगण्यात आले. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली, अशा २४ जणांना संशयित म्हणून अकोला येथे ‘थ्रोट स्वॅब’साठी रेफर केल्याची माहिती अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक स्नेहल रेड्डी यांनी दिली आहे.
अकोट तालुका व शहरात पुणे, मुंबई व इतर महानगरात नोकरी व शिक्षणानिमित्त असलेले अनेकजण गावी परतले आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. शिवाय, दिल्ली येथून परतलेल्या दोघांनाही अकोला रेफर करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबाचीही तपासणी करण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे शहर व तालुक्यात काटेकोर पालन करावे, अशा सूचना सर्व अधिनस्त यंत्रणेला उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचे तहसीलदार राजेश गुरव यांनी सांगितले. शिवाय, शहरात आजाराबाबत जनजागृती करण्यात येऊन तक्रार कक्ष उघडण्यात आल्याची माहिती मुख्याधिकरी दादाराव डोल्हारकर यांनी दिली. संचारबंदी शिथिलता काळात तसेच ‘लॉकडाऊन’मध्ये नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले आणि ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी बंदोबस्त तैनात केला आहे.