CoronaVirus : अकोला जिल्ह्यात दिवाळीनंतर सात दिवसांत २४७ नवे रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:07 AM2020-11-22T11:07:06+5:302020-11-22T11:07:18+5:30
CoronaVirus:News दिवाळीपूर्वी १३ नोव्हेंबर रोजी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
अकोला: जिल्ह्यात मंदावलेला कोरोना रुग्णसंख्यावाढीचा वेग दिवाळीनंतर पुन्हा वाढू लागला आहे. दिवाळीनंतर सात दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे २४७ नवे रुग्ण आढळून आले, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवाळीपूर्वी १३ नोव्हेंबर रोजी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दीड महिन्यातील हा सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवालाचा आकडा होता. जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा ऑक्टोबर महिन्यात वेग कमी झाला होता. जवळपास दीड महिने रुग्णसंख्यावाढीचा वेग नियंत्रणात असतानाच १३ नोव्हेंबर रोजी ६५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवाळीच्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोना रुग्णसंख्यावाढीचा वेग पुन्हा वाढू लागला. मागील सात दिवसांत कोरोनाचे तब्बल २४७ रुग्ण आढळून आले, तर पाच जणांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत ५४८ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीनंतरच्या काळात रुग्णसंख्यावाढीसोबतच मृत्यूच्या सत्रातही वाढ होऊ लागली आहे.
खबरदारी आवश्यक
दुसऱ्या लाटेची भीती असताना रुग्णसंख्यावाढ ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. इतरांपासून सुरक्षित इंतर ठेवण्यासोबतच मास्कचा वापर, तसेच नियमित हात स्वच्छ धुणे आणि नाका तोंडाला हात लावणे टाळण्याची गरज आहे.