CoronaVirus : ३१८३ प्रवाशांची तपासणी; आठ 'जीएमसी'ला पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:51 PM2020-03-24T14:51:08+5:302020-03-24T14:51:20+5:30
जिल्ह्यात सोमवारी ३,१८५ प्रवासी आले आहेत.
अकोला : पुणे, मुंबईतून सोमवारी अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहोचलेल्या ३,१८३ तसेच रविवारी शिल्लक असलेल्या प्रवाशांसह ३,४९५ जणांची तपासणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात आली. त्यापैकी ८ जणांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सांगितले. सोबतच जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यासाठी आरोग्य विभागाची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातही सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या शहरांतून प्रवास करून परतणाऱ्या ग्रामस्थांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जात आहे. जिल्ह्यात सोमवारी ३,१८५ प्रवासी आले आहेत. त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच रविवारपर्यंत दाखल झालेल्यापैकी काहींची तपासणी शिल्लक होती. त्यांचीही तपासणी झाल्याने ही संख्या सोमवारी ३,४९५ एवढी झाली आहे. त्यापैकी अकोला तालुक्यातून २, बार्शीटाकळी-१, मूर्तिजापूर तालुक्यातील ५ प्रवाशांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.
गावांमध्ये परतणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आशा वर्कर, आरोग्य सेविका, सेविका, वैद्यकीय अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत ठेवण्यात आले आहे. घरोघरी भेटी देत परत आलेल्यांना तपासणीसाठी आरोग्य केंद्रात आणले जात आहे. त्यासाठी जनजागृतीही केली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यासाठी पथके
राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाचे गठन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी केले. त्यामध्ये अकोट तालुक्यात देवरी फाटा येथे तीन आरोग्यसेवकांची नियुक्ती केली आहे. तसेच मूर्तिजापूर तालुक्यात लोणी फाटा, बार्शीटाकळी तालुक्यात महान, पातूर तालुक्यात मेडशी, बाळापूर तालुक्यात शेगाव फाटा, निंबा फाट्याजवळ पथके तैनात करण्यात आली आहे.