CoronaVirus : ग्रामीण भागात ७९५ प्रवासी ‘क्वारंटीन’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 PM2020-04-26T17:00:13+5:302020-04-26T17:02:37+5:30
दैनंदिन प्रवासी दाखलच होत असल्याने त्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
अकोला : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउननंतरही जिल्ह्यात प्रवाशांचा ओघ सुरूच आहे. २५ एप्रिल रोजीही जिल्ह्यात १११ प्रवासी दाखल झाले. त्यांची तपासणी करण्यात आली. या दिवसापर्यंत जिल्ह्यात एकुण २०,६४३ प्रवासी दाखल झाले आहेत. त्यापैकी १९,८४८ जणांचा ‘क्वारंटीन’ कालावधी संपुष्टात आला आहे. ७९५ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरच कोरोना प्रसाराचा धोका थांबणार आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो लोक कामानिमित्त देश, राज्यातील विविध शहरांमध्ये होते. त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी अकोला जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती वाढतच गेली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २२ मार्चपासून दैनंदिन येणाºया प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. २५ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २२६ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या २५ एप्रिलपर्यंत २०,६४३ एवढी झाली. त्यापैकी १९,८४८ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी समाप्त झाला आहे. आता ७९५ प्रवासी ‘क्वारंटीन’ आहेत. दैनंदिन प्रवासी दाखलच होत असल्याने त्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. लॉकडाउनच्या काळातही प्रवासी येत असल्याने त्यांचा प्रवास कसा होत आहे, ही बाब आता शोधाची झाली आहे.