CoronaVirus in Akola : आणखी ११ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १९७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 10:37 AM2020-05-14T10:37:10+5:302020-05-14T10:38:32+5:30
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर म्हणजेच १९७ वर पोहली आहे.
अकोला : अकोल्यात हातपाय पसरलेल्या कोरोना विषाणूने आता चांगलाच वेग घेतला असून, कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणीक झपाट्याने वाढत आहे. गुरुवार, १४ मे रोजी यामध्ये आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली असून, या अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर म्हणजेच १९७ वर पोहली आहे. सद्यस्थितीत १२२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी सांगण्यात आले.
विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. सुरुवातीला केवळ बैदपूरा भागापर्यंत मर्यादित असलेल्या कोरोना विषाणूने अल्पावधित संपूर्ण शहरच कवेत घेतले असून, विविध भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवार, १४ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून एकूण ७४ जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यामध्ये दोन रुग्ण हे खैर मोहम्मद प्लॉट, दोन माळीपूरा, तसेच फिरदोस कॉलनी,आंबेडकर नगर, शासकीय गोदाम खदान, गोकुळ कॉलनी, तारफैल, खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आज ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९७ झाली आहे. यामधून आतापर्यंत ६० जणांनी कोरोनावर मात केली असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोवीड-१९ आजाराने १४ जणांचा मृत्यू, तर एका रुग्णाची आत्महत्या, अशा एकूण १५ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.
आज प्राप्त अहवाल-७४
पॉझिटीव्ह-११
निगेटीव्ह-६३
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १९७
मयत-१५(१४+१),डिस्चार्ज- ६०
दाखल रुग्ण( पॉझिटिव्ह)- १२२