CoronaVirus In Akola : २४ तासांत १५ संदिग्ध रुग्ण वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:39 AM2020-04-06T10:39:18+5:302020-04-06T10:39:26+5:30
६२ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’, तर ५२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळला नसला तरी, गत २४ तासांत १५ संदिग्ध रुग्ण ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल झाले आहेत. आतापर्यंत ११४ जणांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यापैकी ६२ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’, तर ५२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
नागपूर येथील लॅबमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने अहवाल मिळण्यास दिरंगाई होत आहे; परंतु रविवारी आठ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते ‘निगेटिव्ह’ आले आहेत. गत २४ तासांत १५ संदिग्ध रुग्ण वाढले. रविवारी आठ जणांना ‘आयसोलेशन’ कक्षातून सुटी देण्यात आली असून, ५२ जणांवर ‘आयसोलेशन’ कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. याशिवाय, जिल्ह्यात आतापर्यंत २४२ प्रवाशांची नोंद करण्यात आली असून, त्यातील ६९ जणांना ‘होम क्वारंटीन’ ठेवण्यात आले आहे, तर १२० जणांना ‘होम क्वारंटीन’मधून मुक्त करण्यात आले असून, ५२ ‘आयसोलेशन’ कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.
दिल्ली येथून परतलेल्या आणखी चौघांची नावे प्राप्त
दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या आणखी चौघांची नावे प्रशासनाला प्राप्त झाली आहेत. ही संख्या आता ३३ वर पोहोचली असून, त्यातील ३२ जणांशी संपर्क झाला आहे. यातील १२ जण हे जिल्ह्याबाहेर असून, संबंधित जिल्हा प्रशासनाला ही माहिती कळविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच उर्वरित सर्वांच्या वैद्यकीय तपासण्या करून यातील चौघांना ‘होम क्वारंटीन’, तर १६ जणांना सर्वोपचार रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात ठेवण्यात आले आहे.