CoronaVirus in Akola : दिवसभरात २२ नवे पॉझिटिव्ह; ५७ जण बरे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 07:17 PM2020-06-26T19:17:25+5:302020-06-26T19:19:12+5:30
शुक्रवार, २६ जून रोजी दिवसभरात २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २६ जून रोजी दिवसभरात २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३६४ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २४३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी २४२ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील पाच जण अकोट फैल येथील, तीन जण गुलजारपुरा येथील, तीन जण लाडीस फैल, दोघे हरिहर पेठ येथील, तर उर्वरित राधाकृष्ण प्लॉट, आंबेडकरनगर, कमलानेहरू नगर, तारफैल, इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एक महिला व दोन पुरुष आहेत. ते सिंधी कॅम्प, दशहरा नगर आणि बाळापूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
५७ जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथून ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या ५७ रुग्णात तारफैल येथील सात जण, गायत्रीनगर येथील सहा जण, सिंधी कॅम्प येथील पाच जण, हरिहरपेठ येथील पाच जण, मोठी उमरी येथील पाच जण, रामदास पेठ येथील पाच जण,आदर्श कॉलनी येथील तीन जण, न्यू तारफैल येथील दोन, खदान येथील दोन, बाळापूर येथील दोन, तर रजपुतपुरा, चांदुर, शिवसेना वसाहत, अकोट फैल, अशोक नगर, कैलास टेकडी, खोलेश्वर, गोकुळ कॉलनी, मोहता मिल, रेल्वे स्टेशन, माळीपूरा, खैर मोहम्मद प्लॉट, शिवाजी नगर, लहान उमरी, अकोट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोवीड केअर सेंटर येथून देण्यात आली.
२४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १३६४ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७४ जण (एक आत्महत्या व ७३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०४७ आहे. तर सद्यस्थितीत २४३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.