CoronaVirus in Akola : आणखी ३२ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू, एकूण रुग्णसंंख्या २५२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:41 PM2020-05-17T12:41:16+5:302020-05-17T12:42:50+5:30
१६९ संदिग्ध रुग्णांच्या अहवालापैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, अन्य १३७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अकोला : अकोलेकरांसाठी शनिवारचा दिवस दिलासादायक ठरल्यानंतर रविवार, १७ मे रोजी तब्बल ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कालचा दिलास औटघटकेचा ठरला. रविवारी प्राप्त झालेल्या १६९ संदिग्ध रुग्णांच्या अहवालापैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, अन्य १३७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बुधवार, १३ मे रोजी मयत झालेल्या मुर्तीजापूर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील मृतकांचा आकडाही १७ वर गेला आहे. एकूण रुग्णांची संख्या २५२ झाली असून, रविवारी १७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ११७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. शनिवारी केवळ दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांना किंचित दिलासा मिळाला होता. रविवारी तब्बल ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १० महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये तारफैल भागातील ४, माळीपूरा- ४, खैर मोहम्मद प्लॉट- ४ आंबेडकर नगर- ३, ताजनापेठ- ३,अकोट फैल-३, तर मुर्तिजापूर,अगरवेस,बिर्ला गेट, जठारपेठ, खरप, काळा मारोती, जुना आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा,रामदासपेठ पोलीस क्वाँर्टर, नायगाव,खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामधील एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालातून संदर्भित झालेली आहे. मुर्तीजापूर येथील ४८ वर्षीय व्यक्तीला बुधवार, १३ मे रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तीचा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित मृतकांची संख्याही १७ झाली आहे. एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली असून, एकूण १८ मृत्यूची नोंद आहे.
आज प्राप्त अहवाल-१६९
पॉझिटीव्ह-३२
निगेटीव्ह-१३७
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२५२
मयत-१८(१७+१),डिस्चार्ज-११७
दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११७