CoronaVirus in Akola : सायंकाळी ३५ अहवाल निगेटिव्ह; नऊ जणांना ‘डिस्चार्ज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 06:22 PM2020-05-31T18:22:23+5:302020-05-31T18:33:34+5:30
सायंकाळी प्राप्त झालेले ३५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले.
अकोला : दररोज झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने चिंताग्रस्त झालेल्या अकोलेकरांसाठी रविवारची सायंकाळ किंचित दिलासा देणारी ठरली. सायंकाळी प्राप्त झालेले ३५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. सकाळी सात अहवाल निगेटिव्ह आले होते. अशाप्रकारे दिवससभरात ४२ अहवाल निगेटिव्ह आले. तर दुपारी आणखी नऊ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता ११७ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून रविवारी सकाळी १८ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी •सात जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्री नगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट, फिरदोस कॉलनी, जुने शहर, तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त सर्व ३५ अहवाल निगेटिव्ह आल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला.
शनिवारी रात्री दोघांचा मृत्यू
शनिवार रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये एक व्यक्ती सुधीर कॉलनी सिव्हिल लाइन येथील रहिवासी आहेत. या ३८ वर्षीय व्यक्तीला २७ मे रोजी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेली दुसरी व्यक्ती बाळापूर येथील असून, ५४ वर्षीय या व्यक्तीला २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. या दोघांचा काल रात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केले.
आणखी नऊ जणांना ‘डिस्चार्ज’
रविवारी दुपारी आणखी नऊ जणांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. त्यातील सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले, तर अन्य दोघांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ४३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण ३२ जणांचा मृत्यू (एक कोरोनाबाधिताची आत्महत्या) झाला आहे. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयात ११७ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.