CoronaVirus in Akola : दिवसभरात ३९ पॉझिटिव्ह; २८ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:28 PM2020-07-06T18:28:43+5:302020-07-06T18:29:01+5:30
कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या १७४२ वर गेली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारा लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. सोमवार, ६ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या १७४२ वर गेली आहे. दरम्यान, सोमवारी २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी एकूण ३७४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळच्या अहवालात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात १७ महिला तर १६ पुरुष रुग्ण आहेत. ते बाळापूर येथील ११, बोरगाव मंजू येथील पाच, जेल क्वार्टर येथील तीन, पोळा चौक येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन तर उर्वरित ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, वानखडे नगर, कैलास नगर, आदर्श कॉलनी, वाशीम बायपास, महान, अकोट, खामगाव बुलडाणा व मालेगाव वाशीम येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला(१३ महिन्यांच्या बालिकेसह) व तीन पुरुष आहेत (एक चार वर्षे व एक आठ वर्षीय बालकांसह) या रुग्णांपैकी चार जण गिता नगर येथील तर अन्य नानक नगर व कच्ची खोली येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत ,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
२८ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० तर कोविड केअर सेंटर येथून १८ अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या १० जणांपैकी चार जण हे सिंधी कॅम्प येथील, दोन जण ज्ञानेश्वर नगर, तर उर्वरीत आदर्श कॉलनी, शिवसेना वसाहत, बाळापूर व अकोट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या १८ जणांपैकी आठ जण हरिहर पेठ येथील, सात जण बाळापूर येथील तर दोन जण पातूर व एक जण सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे.
३६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १७४२ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८९ जण (एक आत्महत्या व ८८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२८६ आहे. तर सद्यस्थितीत ३६७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.