CoronaVirus in Akola : दिवसभरात ४० पॉझिटिव्ह; १६ जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 06:33 PM2020-06-03T18:33:26+5:302020-06-03T18:36:18+5:30
बुधवार, ३ जून रोजी दिवसभरात ४० जणांची भर पडत एकूण रुग्णसंख्या ६६७ झाली आहे.
अकोला : अकोल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, बाधित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, ३ जून रोजी दिवसभरात ४० जणांची भर पडत एकूण रुग्णसंख्या ६६७ झाली आहे. बुधवारी सकाळी ३६ जणांचे तर सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, दुपारी आणखी १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ४७८ बरे झाल्याने सद्यस्थितीत १५५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
अकोला जिल्ह्यात कोरोना प्रचंड वेगाने हातपाय पसरत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. मंगळवार, २ जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६२७ होती. यामध्ये बुधवारी आणखी ४० रुग्णांची भर पडून हा आकडा ६६७ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून बुधवारी १३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९८ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त ३६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४ महिला व २२ पुरुष आहेत. त्यातील ११ जण अकोट फैल येथील, पाच जण देशमुख फैल येथील, कैलास टेकडी येथील तीन, खदान येथील तीन, न्यू तार फैल येथील तीन तर पाककरपुरा अकोट, अनिकट, बलोदे ले आउट -हिंगणघाट रोड, ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर, हिंद चौक, मोठी उमरी, रामदास पेठ, गुलजार पुरा, तार फैल, हरिहर पेठ, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालांपैकी चार जण पॉझिटिव्ह असून, त्यात तीन महिला व एक पुरुष आहे. ते खदान, अकोट फैल, शिवाजी नगर, संताजी नगर येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही ३४ वर गेली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केलेली आहे.
आणखी १६ जण झाले बरे
दुपारनंतर १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील पाच जण रामदास पेठ येथील , तीन जण अकोट फैल येथील तर खदान, मलकापूर, सिंधी कॅम्प, सोनटक्के प्लॉट, कैलास टेकडी, छोटी उमरी, रजपूत पुरा, हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. डिस्चार्ज दिलेल्या १६ जणांपैकी तीन जणांना घरी सोडण्यात आले. तर उर्वरित १३ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
प्राप्त अहवाल-१३८
पॉझिटीव्ह-४०
निगेटीव्ह-९८
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६६७
मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४७८
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१५५