CoronaVirus in Akola : ४६ नवे पॉझिटिव्ह; २३ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 06:52 PM2020-07-29T18:52:11+5:302020-07-29T20:25:26+5:30
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८ , तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १८ असे एकूण ४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, २९ जुलै रोजी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८ , तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १८ असे एकूण ४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०४ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २५४२ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २५४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८ अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित २२६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळीे नऊ महिला व १० पुरुषांसह १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये अकोट येथील १५ जणांसह अकोला शहरातील दगडीपूल, बाभूळळगाव, पांढरी व तेल्हारा तालुक्यातील राणेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी एक महिला व आठ पुरुषांसह नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पातूर तालुक्यातील आलेगाव येथील दोन जण, तर बोंदरखेड, गोलबाजार, हिंगणा रोड, जीएमसी, रौनक मंगल कार्यालय, मुर्तिजापूर व अकोट येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हिवरखेड येथील महिलेचा मृत्यू
दरम्यान, बुधवारी आणखी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. ही ६० वर्षीय महिला तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील असून, त्यांना १५ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
२३ जणांना डिस्चार्ज
बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १४ जण, ओझोन हॉस्पीटल व हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी दोन तर आयकॉन हॉस्पीटल येथून एक अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३८४ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५४२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.