CoronaVirus in Akola : दिवसभरात ४७ रुग्ण वाढले; १० जण बरे झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 07:37 PM2020-08-10T19:37:07+5:302020-08-10T19:37:34+5:30
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३, तर रॅपिड अॅन्टिजन चाचण्यांमध्ये १४ असे एकूण ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०६७ वर पोहचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराची नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवार, १० आॅगस्ट रोजी जिल्हाभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३, तर रॅपिड अॅन्टिजन चाचण्यांमध्ये १४ असे एकूण ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०६७ वर पोहचली आहे. दरम्यान, आणखी दहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ४३३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४०० अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३३ रुग्णांमध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती येथील सहा जण, रिधोरा येथील चार जण, अकोट, जठारपेठ, हिवरखेड येथील प्रत्येकी तीन जण, बार्शीटाकळी येथील दोन जण, शिवणी, गौरक्षण रोड, गीता नगर, केळकर हॉस्पीटल, सुधीर कॉलनी, मोठी उमरी, माना, पातूर, सिव्हील लाईन, पिंपरी ता अकोट, दहिगाव गावंडे ता.अकोला व वाल्पी ता.बाशीर्टाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रॅपिड अॅन्टीजन टेस्ट: १६५ चाचण्यांमध्ये १४ पॉझिटिव्ह
रॅपिड अॅन्टीजन टेस्ट मोहिमेअंतर्गत सोमवारी दिवसभरात झालेल्या १६५ चाचण्यांमध्ये केवळ १४ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला ग्रामीण, बाळापूर, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाहीत. अकोट तेथे ५४ चाचण्या झाल्या त्यामध्ये सात अहवाल पॉझिटीव्ह आले. बार्शीटाकळी तेथे आठ चाचण्या झाल्या त्यात एक पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे ६० चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला मनपा क्षेत्रात ३१ चाचण्या झाल्या त्यामध्ये चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी १९ जणांच्या चाचण्या झाल्या. त्यामध्यसे कुणीही पॉझिटीव्ह नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. जिल्'ात आतापर्यंत ९७६८ चाचण्या झाल्या असून ४९६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
१० जणांना डिस्चार्ज
सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, ओझोन हॉस्पीटल व आॅयकॉन हॉस्पीटल येथून प्रत्येकी एक, तर हॉटेल रेजेन्सी येथून पाच अशा एकूण १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५२६ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४२५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५२६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.