CoronaVirus in Akola: एकाच दिवशी ५ मृत्यू; २७ पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ६४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 07:14 PM2020-06-20T19:14:01+5:302020-06-20T19:37:05+5:30
शनिवार, २० जून रोजी दिवसभरात पाच कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.
अकोला : अकोल्यात हातपाय पसरलेल्या कोरोनाने आता रौद्र रुप धारण केले असून, शनिवार, २० जून रोजी दिवसभरात पाच कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतकांचा आकडा ६४ वर गेला आहे.
तर एकूण बाधितांची संख्याही ११६३ झाली आहे. दरम्यान, आज आणखी दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता ३४७ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, कोरोनाच्या बळींचा आकडाही दिवसागणिक वाढतच आहे. शनिवारी एकाच दिवशी तब्बल पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्हा हादरला आहे. शंकर नगर, अकोट फैल येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यांना १६ जून रोजी दाखल करण्यात आले होते. गुलजारपूरा येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते १६ जून रोजी दाखल झाले होते. पातूर येथील ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांना १५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून ते ८ जून रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल झाले होते. नंतर त्याना ओझोन हॉस्पीटल येथे १४ जून रोजी रेफर करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू ओझोन हॉस्पीटल येथे आज झाला. अकबर प्लॉट, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून, त्यांना ५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा १९ जून रोजी मृत्यू झाल्याची नोंद आज घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
२७ जण पॉझिटिव्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी एकून ३२३ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर २९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
सकाळी प्राप्त पॉझिटिव्ह २५ अहवालात नऊ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यु साई नगर, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगांव मंजू, मूकूंद वाडी, हरिहर पेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलडाणा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन्ही पुरुष आहेत. त्यातील जवाहर नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आणखी १० जणांना डिस्चार्ज
शनिवारी दुपारनंतर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील सहा जणांना घरी सोडण्यात आले. तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यात सात पुरुष आणि तिन महिला आहेत. त्यात अशोक नगर, त्रिमुर्ती नगर, सिंधी कॅम्प, तारफैल, अकोटफैल, शात्री नगर, मोठी उमरी, बाळापूर नाका, लहान उमरी, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
३४७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ११६३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ६४ जणांचा (एक आत्महत्या व ६३ कोरोनामुळे) मृत्यू झाला आहे. आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७५२ आहे. तर सद्यस्थितीत ३४७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त अहवाल- ३२३
पॉझिटीव्ह- २७
निगेटीव्ह- २९६
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११६३
मयत-६४ (६३+१), डिस्चार्ज- ७५२
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटीव्ह)- ३४७