CoronaVirus in Akola : ६२ टक्के रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:20 AM2020-06-23T10:20:54+5:302020-06-23T10:21:13+5:30
आतापर्यंत जवळपास ६१.५४ टक्के रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र यासोबतच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत जवळपास ६१.५४ टक्के रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या अन् दररोज जाणारे कोरोनाचे बळी अकोलेकरांची चिंता वाढवत आहेत. विदर्भात सर्वाधिक जास्त मृत्यूदरही अकोल्याचाच आहे; मात्र दुसरीकडे बरे होणाºया रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. ही बातमी अकोलेकरांसाठी दिलासा देणारी आहे. ७ एप्रिल ते २१ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण १,१७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.
सरासरी ३० या प्रमाणे रुग्णसंख्येचा आकडा दररोज वाढत आहेत, तर दिवसाला सरासरी १५ रुग्ण बरेदेखील होत आहे. आतापर्यंत ७६५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना सर्वोपचार रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ही अकोलेकरांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी असली, तरी अजून संकट टळले नाही. त्यामुळे अकोलेकरांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.
सौम्य लक्षणे असलेले रुग्ण क्वारंटीन
बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली; मात्र ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कृषी विद्यापीठातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात वैद्यकीय निगराणीत ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित रुग्णांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे.
ही खबरदारी आवश्यक
- महत्त्वाचे काम नसेल तर घरातच थांबा
- नियमित मास्कचा उपयोग करा
- फिजिकल डिस्टन्सिंग पाळा
- नियमित हात धुवा
- रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार व नियमित व्यायाम करा.