CoronaVirus in Akola : दिवसभरात ८ नवे पॉझिटिव्ह; आणखी दोघे कोरोनाबाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 06:14 PM2020-05-02T18:14:20+5:302020-05-02T18:21:46+5:30
सकाळी सहा, तर सायंकाळी २ असे एकून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
अकोला : बस्तान मांडलेल्या कोरोना विषाणूने अकोल्यात झपाट्याने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, शनिवार, २ मे रोजी दिवसभरात ८ नव्या रुग्णांची भर पडली. सकाळी सहा, तर सायंकाळी २ असे एकून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ४० झाली असून, प्रत्यक्षात २४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ५८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५० अहवाल निगेटीव्ह तर आठ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.१) दाखल एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा सहा जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. तर सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालात दोघा जणांचे अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालातील एक रुग्ण हा मोहम्मद अली रोडवरील रहिवासी आहे. तर अन्य पाच हे अकोट फैल, मेहेरनगर, सुधीर कॉलनी, शिवाजी नगर, कमलानगर अशा पाच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. हे पाचही जण एकाच खाजगी रुग्णालयात काम करतात. त्यात डॉक्टरचाही समावेश आहे. दि. २८ रोजी अत्यवस्थ अवस्थेत दाखल ज्या महिला रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला होता, त्या महिलेच्या संपर्कात हे पाचही जण आले होते. शासकीय रुग्णालयात येण्याआधी ती महिला या खाजगी रुग्णालयात गेली होती. तर सायंकाळी अहवाल आलेले रुग्णांत एका ३० वर्षीय महिलेचा समावेश असून अन्य एक ४० वर्षीय पुरुष आहे आणि ते फतेह चौक व बैदपूरा या भागातील रहिवासी आहेत, त्यांचे संपर्क शोधण्याचे काम सुरु आहे.
२४ जण उपचार घेत आहेत
आता सद्यस्थितीत ४० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील पाच जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व गुरुवारी (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत २४ जण उपचार घेत आहेत.