CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटिव्ह; २८ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:23 PM2020-05-15T12:23:28+5:302020-05-15T12:27:53+5:30
आज प्राप्त झालेल्या तब्बल ९६ संदिग्ध रुग्णांच्या अहवालापैकी केवळ एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अकोला : गत आठवड्यापासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येला शुक्रवार, १५ मे रोजी थोडा ‘ब्रेक’ लागला असून, आज प्राप्त झालेल्या तब्बल ९६ संदिग्ध रुग्णांच्या अहवालापैकी केवळ एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच गुरुवारी रात्री २८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना आयसोलेशन कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी चौघांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर उर्वरित २८ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
नागपूरनंतर अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. सहा एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या अकोल्यात १४ मे पर्यंत कोरोनाबाधितांच्या आकडा दोनशेचा टप्पा ओलांडत २०७ वर पोहचला होता. शुक्रवार, १५ मे रोजी यामध्ये केवळ एकच पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडल्याने अकोलेकरांकरीता ही दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी खडकी येथील निसर्ग सोसायटीमधील एका ३५ वर्षिय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २०८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०० जणांनी कोरोनवर मात केली असून, १४ जणांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १५ असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. सद्यस्थितीत ९३ जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आज प्राप्त अहवाल-९६
पॉझिटीव्ह-एक
निगेटीव्ह-९५
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२०८
मयत-१५(१४+१),डिस्चार्ज-१००
दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-९३