CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटीव्ह; मृत व्यक्तीच्या मुलालाही कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:34 AM2020-04-19T11:34:01+5:302020-04-19T11:34:33+5:30
अकोला शहरातील एका १४ वर्षीय मुलाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सांगण्यात आले.
अकोला : जिल्ह्यात एकीकडे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या फेर तपासणीचे अहवाल निगेटिव्ह येत असताना दुसरीकडे मात्र नवे रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत रविवारी आणखी भर पडली असून, अकोला शहरातील एका १४ वर्षीय मुलाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सांगण्यात आले. कोरोनामुळे १३ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा हा मुलगा असून, त्याची चाचणी केल्यानंतर तोदेखील पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी या मुलाची १७ वर्षीय बहिणही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले होते. या दोघांचीही प्रकृती सद्या स्थिर असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या १५ होती. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता,तर एका रुग्णाने आत्महत्या केली होती. उर्वरीत १२ रुग्णांची गत दोन दिवसांपूर्वी फेरतपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते, तर एका तीन वर्षीय चिमुकल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना बाधितांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असतानाच रविवारी आणखी एका १४ वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे चिंता वाढली असली, तरी दुसरीकडे रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने झालेली सुधारणा दिलासा देणारी आहे.