CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:07 PM2020-08-17T19:07:52+5:302020-08-17T19:08:10+5:30
हिवरखेड येथील एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३६ वर पोहचला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे सत्र सुरुच असून, सोमवार, १७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर हिवरखेड येथील एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३६ वर पोहचला आहे. एकूण रुग्णसंख्या ३२५१ झाली असून, सोमवारी ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ४२० जणांवर उपचार सुरु आहेत.
कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असले, तरी त्यात फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तीघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या तीघांपैकी दोन महिला असून, एक पुरुष आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड व अकोला शहरातील गुलजारपूरा भागातील हे रुग्ण आहेत.
हिवरखेड येथील वृद्धाचा मृत्यू
तेल्हारा तालुक्यातयील हिवरखेड येथील ७२ वर्षीय पुरुषाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णास १३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.
३९ जणांना डिस्चार्ज
सोमवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६ जणांना, कोविड केअर सेंटर येथून नऊ जण, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून सात जण, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा जण व हॉटेल रेजन्सी येथून एक जणांना अशा एकूण ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४२० जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २६९५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.